दसरा मेळाव्यापूर्वी बँनरबाजी करून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून वातावरण निर्मिती

 

शिवसेना आणि शिंदे गटाचा मेळावा एकाच दिवशी होणार असून या दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून मुंबईतील दादर, वरळी परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील या मेळाव्यासाठी शुभेच्छा देणारे बॅनर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मेळाव्यापूर्वी ठाकरे गटाकडून वातावरण निर्मिती केली जात असल्याचं चित्र आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा वांद्रे कुर्ला संकुलात अर्थात बीकेसीमध्ये होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थासाठी दोन्ही गट आमनेसामने आले होते. हा वाद कोर्टातही पोहोचला होता. अखेर हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. आता मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.

दसरा मेळाव्याकरता शिवसेनेच्या शाखांमधली तयारी पूर्ण झाली आहे. विशेषत: दादर, प्रभादेवीमधील शिवसेनेच्या शाखांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरात अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी शिवसेनेचे पदाधिकारीही घेणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनाही पदाधिकाऱ्यांकडून शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

Team Global News Marathi: