दलित समाजातले नेते झाले पंजाबचे नवे मुख्यमंत्री, नवजोत सिंह सिद्धू यांचा पत्ता कट !

 

दलित समाजाचे नेते चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. काँग्रेस हायकम सोनिया गांधी यांनी चरणजीत सिंग चन्नी यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंजाब विधिमंडळात काँग्रेसचे नेते म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर एकमत झालं आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, असं रावत यांनी म्हटलं आहे.

“हा हायकमांडचा निर्णय आहे. मी या निर्णयाचं स्वागत करतो. चन्नी हे माझ्या लहान बंधूसारखे आहेत. मी अजिबातच नाराज नाही”, असं काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील उमेदवार सुखजिंदर सिंग रंधावा यांनी म्हटलं आहे. शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सुनील जाखड, सुखजिंदर सिंह रंधावा, नवज्योत सिंग सिद्धू, प्रताप सिंह बाजवा यांची नावं चर्चेत होती.

मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि पंजाबमधील काँग्रेस नेत्यांच्या दिवसभर झालेल्या बैठकांमध्ये चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. ५८ वर्षीय चन्नी दलित शीख समाजातले नेते आहेत. अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळात ते तंत्रशिक्षण मंत्री होते. गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये दलित नेते प्रमुख भूमिकेत येऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती.

Team Global News Marathi: