राज्यात कोरोनाचा कहर: रविवारी आढळली आजवरची सर्वोच्च रुग्णसंख्या

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) आज १७,८७४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २३,३२,४५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.९५% एवढे झाले आहे. आज राज्यात ४०,४१४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यात आज १०८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९३,५८,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,१३,८७५ (१४.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १५,५६,४७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या २४ तासांत मुंबईत ६ हजार ९२३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. शहरात आतापर्यंत एकदाही इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आलेले नाहीत. आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील कोरोना मृतांचा आकडा ११ हजार ६४९ वर पोहोचला. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ९८ हजार ६७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ११ हजार ६४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कोरोना रुग्णांचा सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

गेल्या २४ तासांत पुण्यात ४४२६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ३५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याचबरोबर, २१०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६४५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच, पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ३३१२३ इतकी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट निर्देश दिले की, एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला  आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

 

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: