‘काँग्रेसनेच अनेकदा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला’, जयंत पाटलांचे मोठे विधान

 

गोंदिया जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या अध्यक्ष आणि सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात युती झाल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान केलं. त्यांच्या या विधानावर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेतील घटकपक्ष असूनही नाना पटोले अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाना पटोलेंच्या विधानाला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं.

काँग्रेसनेच अनेकदा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसला, असं जयंत पाटील म्हणाले. “भंडारा-गोंदिया जिल्हा परिषद 2010 मध्ये राष्ट्रवादीचे 14 सदस्य विजयी झाले. पण काँग्रेस आमदार गोपालदास आग्रवालांची भाजपसोबत हातमिळवणी झाली. त्यानंतर 2015 मध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक 20 सदस्य विजयी झाले. तरीही 16 सदस्य जिंकलेल्या काँग्रेसने भाजपशी समझोता केला.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही गोंदिया जिल्ह्यात भाजप-काँग्रेसची युती होती. काँग्रेसने पाच वर्षांपूर्वी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात भाजपच्या परिणय फुकेंना मतदान केलं”, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: