शिवसेनेमुळे काँग्रेस चिंतातूर! विधान परिषदेतही धोबीपछाड?

शिवसेनेमुळे काँग्रेस चिंतातूर! विधान परिषदेतही धोबीपछाड?

नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता शिवसेनेने येत्या २० तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत असहकाराची भूमिका घेतल्याने काँग्रेसचे धाबे दणाणले असल्याचे वृत्त आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला तर संजय राऊत थोडक्यात बचावले. महाविकास आघाडीला धूळ चारत भारतीय जनता पार्टीने आपला तिसरा उमेदवार धनंजय महाडिक यांना निवडून आणले. महाविकास आघाडीसोबतच अपक्ष आणि सहयोगी पक्षाच्या आमदारांना गृहीत धरून महाविकास आघाडीने या निवडणुकीतील रणनीती तयार केली होती. यामध्ये ४१ मतांचा कोटा ठरल्याने तीनही उमेदवारांना प्रत्येकी ४२ मते देऊन चौथ्या उमेदवारालाही पहिल्या पसंतीच्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा होता.

शिवसेनेच्या कोट्यातील सुहास कांदे यांचे मत निवडणूक आयोगाने बाद केले. नवाब मलिक आणि अनिल देशमुख मतदानच करू शकले नाहीत आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीने ऐनवेळी आपला कोटा वाढवून घेतल्याने सर्व गणित बिघडले आणि शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार पराभूत झाले. या निवडणुकीत काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांना ४४ तर प्रफुल्ल पटेल यांना ४३ मते पडली. ज्या अपक्ष वा लहान पक्षाच्या काही आमदारांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकली असा शिवसेनेच्या नेत्यांना संशय आहे ते काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य आहेत. त्यामुळे आता शिवसेनेने विधान परिषदेच्या निवडणुकीत आपल्या सहकारी पक्षांशी असहकार्य करण्याचे ठरविले असल्याचे बोलले जाते. विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांची जबाबदारी घ्यावी, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे कळते.

 

विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होणार आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपाचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते. त्यातच काँग्रेसने मित्रपक्षांच्या मदतीच्या भरवशावर आणखी एक उमेदवार दिला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या या भूमिकेमुळे काँग्रेसचे नेते मात्र चिंतेत पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाराज अपक्षांमुळे विधान परिषद निवडणूक गाजणार!

राज्यसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांमुळे लहान लहान पक्ष तसेच अपक्ष बऱ्याच प्रमाणात संतप्त झाले असून याचे पडसादही विधान परिषदेच्या निवडणुकीत उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, त्यांचे इतर दोन सहकारी, अपक्ष आमदार संजयमामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे तसेच देवेंद्र भुयार यांच्यावर दगा दिल्याचा जाहीर आरोप केला होता. ज्यांनी विश्वासघात केला त्यांची यादी आमच्याजवळ आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा गर्भित इशाराही राऊत यांनी दिला. या सर्व आमदारांचा त्यांनी घोडेबाजारातही उभे केले.

 

त्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते व मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दगा देणाऱ्या आमदारांना कसा निधी मिळतो, हे पाहिले जाईल, असे बजावले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यातून आपल्याला बाजूला काढताना अपक्षांची सारी जबाबदारी शिवसेनेची होती, असे सांगितले.

या सर्व घडामोडीत अपक्ष तसेच लहानसहान पक्षांचे आमदार कमालीचे दुखावले असून विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला धडा शिकवण्याचे ठरवले असल्याचे कळते. विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जूनला निवडणूक होणार आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपाचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस होऊ शकते.

विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २८ मतांची गरज उमेदवाराला आहे. भाजपाकडे मित्रपक्षांसह ११२ आमदारांचे संख्याबळ आहे तर महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी राष्ट्रवादी ५४, शिवसेनेकडे ५६ तर काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. असे असतानाही राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेसाठीही भाजपाने एक जादा उमेदवार जाहीर केला.

भाजपाच्या वतीने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि प्रसाद लाड यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापाठोपाठ सदाभाऊ खोत यांनी भाजपाच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाचे आता अप्रत्यक्ष सहा उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत.

राज्यसभा निवडणुकीत मतदाराला पक्षाच्या प्रतोदाला मतपत्रिका दाखवणे बंधनकारक असले तरी विधान परिषदेसाठी मात्र गुप्त मतदान होते. त्यामुळेच भाजपाच्या सहा उमेदवारांमुळे महाविकास आघाडीचे नेते धास्तावले आहेत.

शिवसेनेने त्यांचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई तसेच दिवाकर रावते यांच्याऐवजी वरळी विधानसभेची जागा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोकळी करणाऱ्या सचिन अहिर तसेच नंदुरबारचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

राष्ट्रवादीने विद्यमान सभापती रामराजे नाईक निंबाळकर तसेच अलिकडेच राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या, १३ जूनला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख असून शेवटी किती उमेदवार रिंगणात राहतील, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: