इंदापूर : इंदापूर विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार काँग्रेस पक्षाचा असेल अशी गर्जना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी इंदापूरात केली आहे. या घोषणेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुख्य म्हणजे इंदापूरच्या जागेसाठी थेट दिल्लीतून बोलणी होते, एवढी इंदापुरची जागा राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी महत्त्वाची आहे.
तसेच या जागेच्या मुद्द्यावरून माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यात आता पुन्हा एकदा काँग्रेसने या जागेवर आपला हक्क सांगितल्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीच काय? असा प्रश्न उपस्थित राहिला आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या सोबत मंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता वाढली आहे
नाना पटोले पंढरपूरच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असता त्यांनी इंदापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल असं म्हणत आघाडीमध्ये पुन्हा बिघाडी होण्याचे संकेत दिले आहे. पटोलेंच्या वक्तव्याने इंदापूरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध रंगण्याचे चिन्हं दिसत आहे.