काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा

ग्लोबल न्यूज: आपल्या गेल्या अनेक वर्षांतल्या योगदानाकडे दुर्लक्ष करत मुख्य प्रदेश प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची नियुक्ती केल्यामुळे संतप्त झालेले महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पक्षाचे प्रवक्तेपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आजच पक्षाच्या विविध नेत्यांकडे विविध स्वरूपाची जबाबदारी सोपवली. त्यात त्यांनी अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची व डॉ. सुनील देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी सोपवली. माध्यम आणि संवाद विभागाची तसेच मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अतुल लोंढे यांच्याकडे सोपवण्यात आली असून सचिन सावंत आणि जाकीर अहमद यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या या निर्णयाने नाराज झालेले सावंत यांनी काही वेळेतच पटोले यांच्याकडे पत्र पाठवले असून आपल्याला प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मोकळे करण्याची विनंती केली असल्याचे कळते. बरेच वर्षे आपण हे काम करत असल्यामुळे आता आपल्याला पक्षसंघटनेत इतर काही जबाबदारी द्यावी, अशी विनंती केली आहे. याच पत्राची प्रत त्यांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडेही पाठवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सचिन सावंत पक्षाचे प्रदेश सरचिटणिस असून सध्याच्या सरकारने त्यांची विधान परिषदेचे सदस्य म्हणून नेमणूक करावी, अशी शिफारस राज्यपालांकडे केली आहे.

काँग्रेसच्या इतर नेत्यांकडे सोपवल्या या जबाबदाऱ्या

प्रदेशाध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याच्या नियोजनाची जबाबदारी प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. सोशल मीडिया विभागाचा प्रभार प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर हे सहप्रमुख असतील. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आ. अभिजीत वंजारी हे सहप्रमुख व प्रदेश सरचिटणीस माजी आमदार दिप्ती चवधरी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

निवडणूक व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, सहप्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, मुनाफ हकीम व सदस्यपदी विश्वजीत हाप्पे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशिक्षण विभागाच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रामहरी रूपनवर, सहप्रमुखपदी शाम उमाळकर, संजय बालगुडे यांची व सदस्यपदी डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती प्रमुखपदी माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, सदस्यपदी सूर्यकांत पाटील व प्रशांत गावंडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

बुथ विस्तार समितीच्या प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष भा. ई. नगराळे, सहप्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष हरिष पवार, सदस्यपदी प्रदेश सचिव सचिन साठे व नंदा म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: