काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत, कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी

 

मुंबई – एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही सक्रीय झाले आहेत. मात्र, अनेक जिल्ह्यातील शिवसैनिक, नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन युती सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. याच दरम्यान आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सावंत यांनी मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यानंतर आता अरुण सावंत हे आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला विभागातील युवासेना तसेच पालघर, विक्रमगड, खालापूर, दहिसर, चांदीवली येथील शिवसेना, काँग्रेस आणि मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. याबाबत काही फोटो देखील शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ५८ शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला होता.

Team Global News Marathi: