काँग्रेच्या उमेदवार जयश्री जाधवांच्या विजयाची जबाबदारी शिवसेनेची, मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आदेश

 

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला असून काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेने आपल्या खांद्यावर घेतली असून स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यात लक्ष घातले आहे.

काँग्रेस उमेदवार जाधव यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. तुम्ही कामाला लागा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना दिला. त्यामुळे कोल्हापुरात क्षीरसागर हे काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा प्रचार करणार आहेत.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र शिवसेनेने आघाडी धर्माचे पालन करत ही जागा काँग्रेसला सोडली. त्यामुळे क्षीरसागर नाराज झाले होते. आता उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांची मनधरणी करत त्यांची नाराजी दूर केली आहे.

मुंबईमध्ये सोमवारी दुपारी ठाकरे आणि क्षीरसागर यांच्यात बैठक झाली. ज्यावेळी आघाडी झाली, तेव्हा जेथे ज्या पक्षाचा आमदार आहे, तेथे तोच राहणार असल्याचे ठरले आहे. आघाडी होताना जे ठरले आहे, त्याच पद्धतीने जावे लागणार आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसची असली तरीही महाविकास आघाडी म्हणून ती लढविली जात आहे. त्यामुळे कामाला लागा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी क्षीरसागर यांना दिला आहे.

Team Global News Marathi: