काँग्रेस आज ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा करणार

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी गुरुनानक जयंतीच्या मुहूर्तावर देशात नव्याने लागू करण्यात आलेले तीन केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. तब्बल वर्षभरापासून सुरु असणाऱ्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. अशातच कायदे मागे घेण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे आजपासून संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीने ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. त्याच बरोबर काँग्रेसच्या वतीने सभांचे आयोजनही करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेच्या आगामी अधिवेशनात योग्य ती कायदेशीर उपाययोजना करण्यात येईल, असे ते म्हणाले. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ यांनी सर्व राज्य घटकांना २० नोव्हेंबर रोजी राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर कॅन्डल मार्च काढण्यास सांगितले आहे, आपल्या हक्कांसाठी लढताना मोर्चे आणि आंदोलनांमध्ये प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ ‘शेतकरी विजय दिवस’ साजरा केला जाईल, असंही सांगितलं आहे.

दरम्यान, काल पंतप्रधान मोदींनी तिनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला होता. परंतु, कायदे जोपर्यंत संसंदेत रद्द होत नाहीत, तोपर्यंत आपल्या आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतलेला आहे.

Team Global News Marathi: