महाडच्या मुक्तांगण शाळेतील दिव्यांग मुलांनी बनवल्या रंगित पणत्या
महाड : “दीपावली हा अंधारावर प्रकाशाने विजय मिळविण्याचा उत्सव. हा उत्सव साजरा करतांना आपल्या आनंदासोबत सेवाभावाची जोड दिली तर या प्रकाशाचे तेज काही वेगळच होईल. महाडच्या मुक्तांगण शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत कला कौशल्यपूर्ण पणत्या घडवल्या आहेत. महाड शहरातील मुक्तांगण शाळेतील दिव्यांग मुलांच्या शाळेने या विशेष मुलांना उत्तम प्रशिक्षित करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न चालले आहेत. यंदाच्या दिवाळीत याच संस्थेतील विशेष मुलांनी रंगित पणत्यांचे उत्पादन करुन त्या बाजारात विक्रीसाठी आणण्याचे प्रयत्न करीत आहेत.
या पणत्या नागरिकांनी खरेदी करुन आपल्या घरी त्यात दिवे लावले तर त्या प्रकाशाला सेवाभावाचे तेज लाभणार आहे. या संस्थेत सध्या महाड तालुक्यातील शहरातील २० विशेष मुलं शिक्षण घेत आहेत. या मुलांना विविध उपचार पद्धतींनी शिक्षण दिले जाते. त्यात त्यांच्या दैनंदिन क्रिया करण्यापासून ते लेखन वाचन, अंक ओळख, व्यवहार गणित यासारख्या बाबींचेही शिक्षण दिले जाते. मुलांच्या बुध्यांक पाहून त्यानुसार प्रत्येक मुलाला वेगळ्या पद्धतीने शिक्षण द्यावे लागते. संस्थेतला सेवाभावी कर्मचारी वर्ग हे करीत असतो. सोबतच मुलांना कौशल्य विकास होण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण ही दिले जात आहे.
त्यातून पणत्यांचे उत्पादन करण्यात येत आहे. यासारखे प्रशिक्षण मुलांना दिले जातात. त्यात ही मुले निपूण होऊन समाजात आपली उपजिविका चालवू शकतात. पणत्यांचे रंगकामही सध्या ही मुले करीत आहेत. यंदाच्या दिवाळीत त्यांनी १० हजार पणत्यांचे रंगकाम सुरु केले आहे. रंगवलेल्या या पणत्या आकर्षक पॅकिंग मध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. मुलांची ही प्रगती थक्क करणारी आहे.