राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; उदय सामंत यांची घोषणा –

राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; उदय सामंत यांची घोषणा –

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं जाहीर केला होता.

मुंबईत दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत काल तब्बल १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयं देखील बंद करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

वसतिगृह बंद करण्याचा निर्णय

राज्यातील सर्व विद्यापिठाशी संबंधित वसतिगृहे ही विद्यार्थ्यांना काही कालावधी देऊन तसेच पूर्वसूचना देऊन वसतिगृहे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देऊनच हा निर्णय राबवावा असे उदय सामंत यांनी सांगितले.

परदेशातून जे विद्यार्थी पीचएडी तसेच संशोशधनासाठी आले आहेत, त्यांची सर्व काळजी घेऊन विद्यापिठे बंद करू नयेत. त्यांची सर्व काळजी विद्यापिठांनी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. हे विद्यार्थी तातडीने परदेशात जाऊ शकत नाही, त्यामुळे परदेशी विद्यापिठासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यासाठी विशेष कॅम्प लावून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील महापालिकांनीही विद्यार्थ्यांच्या कोरोना रूग्णसंख्येचा आकडा माहिती करून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. १५ ते १८ वयोगटातील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कॅम्प लावून लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

चित्रकला परीक्षा ऑनलाईन पद्धतीने

चित्रकला तसेच दहावीच्या आधीच्या परीक्षांच्या ग्रेस परीक्षांबाबतच्या मुद्द्यावर शंका उपस्थित करण्यात आली होती. पण कला संचलनालयला सूचना दिल्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत फेब्रुवारीपर्यंत हे ग्रेस मार्क मिळण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात ही स्पष्टताही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही ही गैरसोय होऊ नये यासाठीची खबरदारी घ्यावी.

शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षकवर्ग यांचे लसीकरण पूर्ण व्हायलाच हवे. तसेच ५० टक्के उपस्थित राहताना उर्वरीत ५० टक्के वर्क फ्रॉम होम पद्धतीने उपस्थितीचे आदेश गुरूवारपासून देण्यात आले आहेत. विद्यापिठांनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चक्राकार पद्धतीने हे काम द्यावे असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

महाविद्यालयांसाठी लवकरच बैठक

आगामी काळात १५ फेब्रुवारीनंतर महाविद्यालयाबाबत काय निर्णय घ्यायचा यासाठी बैठकांमधून पुढचा निर्णय घेण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले. शिक्षक तसेच तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यापुढच्या काळात कोरोनाच्या निर्बंधांचे पालन करावेत. अकृषी विद्यापिठे, खाजगी आणि संलग्न विद्यापिठांसाठी हे नियम लागू असणार आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: