तळीयेत 84 जणांचे सामूहिक उत्तरकार्य; नातेवाईकांना अश्रू अनावर

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात आज अश्रूंचा महापूर पाहायला मिळाला. तळीये गावातील जलनी माता डोंगराचा दरडीचा भाग कोसळून 84 जण गाढले गेले होते. आज 3 ऑगस्ट रोजी, मृत झालेल्या 84 जणांचे ग्रामस्थांनी आणि नातलगांनी सामूहिक उत्तरकार्य केले. मृतांच्या आठवणीने नातलग आणि उपस्थितांचा अश्रूंचा बांध फुटला. यावेळी सारा आसमंत नातलंगाच्या हबरड्याने दाटून आला होता. नातलगांनी आणि ग्रामस्थांनी विधिवत पूजा करून 84 जणांना श्रद्धांजली वाहिली.

22 जुलैची दुपार ही तळीये ग्रामस्थांची काळी दुपार ठरली होती. मुसळधार पावसाने गावातील जलनीमाता डोंगराचा पलिकडील काही भाग हा कोसळण्यास सुरुवात झाली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी घराबाहेर पडून आपला जीव वाचविण्यासाठी गावाच्या मुख्य रस्त्यावर येण्यासाठी धाव घेतली. मात्र त्याचवेळी डोंगराचा बाजूचा दरडीचा मातीचा भाग कोसळून जिवाच्या आकांताने पळत असलेल्या तळये ग्रामस्थांच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत गावातील 32 घरे या दरडी खाली गाढली गेली. या दुर्घटनेत 84 जणांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दडपून मृत्यू झाला.

तळीये येथील दुर्घटना घडल्यानंतर गावातील वाचलेल्या ग्रामस्थांनी 32 मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने एकूण 21 मृतदेह बाहेर काढले. हे शोध कार्य चार दिवस सुरू होते. अखेर मृतदेहाची विटंबना होऊ नये यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हे शोध थांबवावे अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडे केली.

 

त्यानंतर शोध कार्य थांबविण्यात आले. य दुर्घटनेत 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 31 जणांना मृत घोषित करण्यात आले. शासनामार्फ़त 42 जणांना प्रत्येकी 4 लाखाची मदत मृतांच्या नातेवाईकांना देण्यात आलेली आहे. तर उर्वरित तीन लाख रुपयेही लवकरच दिले जाणार आहेत. तळीये दुर्घटनेला आज 13 दिवस पूर्ण झाले आहेत. दरडी खाली मृत झालेल्या 84 जणांचे आज सामूहिक उत्तरकार्य करण्यात आले. यावेळी नातलग, ग्रामस्थ हे मृतांच्या आठवणीने गहिवरले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: