मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

 

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदार संजय शिरसाट यांनी आता पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रातून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहे. या नेत्यांना बडवे आणि कारकून चाणक्य असं म्हणत संजय शिरसाट यांनी गेल्या अडीच वर्षांपासून घडत असलेला प्रकार निदर्शनास आणून दिलाय.

संजय शिरसाट यांचं पत्र…
उद्धवजी ठाकरे,
मुख्यमंत्री,महाराष्ट्र

आमचा विठ्ठल हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून हे पत्र लिहितोय.

पत्रास कारण की…
काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती.

हेच सो कॉल्ड (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही.

मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या मुख्यमंत्री सर्वांना भेटतात, पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा, पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

तीन ते चार लाख मतदारसंघातून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे?

हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान… आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथजी शिंदे यांना आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.

 

Team Global News Marathi: