मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर संजय राऊत म्हणाले की,

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर मंगळवारी दुपारी ईडीकडून कारवाई करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार पाटणकर यांची अंदाजे साडेसहा कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र ठाकरे कुटुंबाला ओळखतो. याची किंमत आज ना उद्या तुम्हाला चुकवावीच लागेल असा इशारा देतानाच ईडीची कारवाई ही तर खतरनाक हुकूमशाहीची सुरुवात असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

“ईडीच्या कारवाईची संसदेत कालच माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी भाजपाची सत्ता नाही तिथंच ईडीच्या सर्वाधिक कारवाया होत आहेत. एखाद्या राज्यात हरलो असेल तर ज्यांनी पराभव केला त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकूमशाहीची नांदी आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“श्रीधर पाटणकर हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा रश्मी ठाकरेपर्यंत मर्यादित नाहीत. ते आमच्या सर्वांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. झारखंड, तामिळनाडू, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात या ठिकाणीच जोरदार कारवाई सुरू आहे. गुजरात आणि इतर राज्यात ईडीने कार्यालय बंद केली आहेत असं वाटतं”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Team Global News Marathi: