मुख्यमंत्रिपदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला यासाठी शुभेच्छा – मनसे

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधक सतत महाविकास आघाडीवर टीका करताना दिसून येत आहेत अशातच हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना शांत बसण्यास भाग पाडले. तसेच विरोधकांच्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर सुद्धा दिले होते.

आमची सर्वांची इच्छा होती की मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला यावे. चहापानाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत स्टॅम्पवर लिहून देऊ का, असा दावा मी केला होता. पण कधी कधी सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्या पद्धतीने मी म्हणालो होतो. असे अजित पवार विधानसभेत काल म्हणाले होते. अजित पवारांच्या या विधानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खोचक टीका केली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून अजित पवारांवर खोचक शब्दात टीका केली. महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील बनावट स्टॅम्प पेपर बहुधा उपमुख्यमंत्रांकडे आला असावा, नाही तर तोंडावर आपटले नसते. असो मुख्यमंत्रिपदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला त्यासाठी शुभेच्छा, अशा खोचक शब्दात संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

Team Global News Marathi: