मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेर मातोश्री सारखी सुरक्षा

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानाला आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाच्या धर्तीवर ठाणे पोलिसांनी सुरक्षा पुरविली आहे.याच सुरक्षाव्यवस्थेचा ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी आढावा घेतला.

शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांना तत्काळ झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अजून तरी त्यांनी मुंबईतील वर्षा हे शासकीय निवासस्थान ताब्यात घेतलेले नाही. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासह मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या निवासस्थानांच्या धर्तीवरच आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी निवासस्थानाभोवतीही पोलिसांचे विशेष सुरक्षाकवच उभारले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा असल्यानेही या सुरक्षेची विशेष खबरदारी घेत असल्याची माहिती ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. या सर्व पार्श्वभूमीवर ठाण्याचे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. पंजाब उगले, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव आदींनी आढावा घेतला.

Team Global News Marathi: