मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी वर्षा बंगल्यावर लागली!

 

मुंबई | राज्यच्या राजकारणात ‘वर्षा’ बंगल्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणून ‘वर्षा’ बंगल्याची ओळख आहे. इतकंच नाही तर हाच ‘वर्षा’ बंगला महाराष्ट्रातील राजकीय घटनांचा, घडामोडींचा साक्षीदार आहे. आता या ‘वर्षा’ बंगल्याला अखेर एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली आहे. परंतु प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी शपथ घेतली. प्रथा आणि नियमाप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं वास्तव्य हे वर्षा बंगल्यावर असतं. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर महिना उलटला तरी एकनाथ शिंदे अद्यापही ‘नंदनवन’ बंगल्यावर वास्तव्यास आहेत.

खरंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2014 पासून मलबार इथल्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले आहेत. महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 जून रोजी ‘वर्षा’ निवासस्थान सोडलं होतं. तेव्हापासून हा बंगला रिकामाच होता. अखेर एक महिन्यानंतर वर्षा निवासस्थानाला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेली आहे.

Team Global News Marathi: