राममंदिर भूमीपूजनासाठी पाकव्याप्त काश्मीर मधील आणली होती शारदापीठाची पवित्र माती ; वाचा सविस्तर-

अयोध्या :  अयोध्येतील राममंदिरासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील शारदापीठातूनही  माती  आणण्यात आली. भारत आणि पाकिस्तानच्या ताणलेल्या संबंधांच्या  पार्श्वभूमीवर मिशन एका भारतीय दांपत्याने  पूर्ण केले, तेही चीनच्या पासपोर्टवर.

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या राममंदिराच्या पायामध्ये संपूर्ण भारतातील तीर्थस्थळांची पवित्र माती आणि नद्यांचे पाणी घालण्यात आले आहे. पाच ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत या मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले.

यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील शारदापीठातूनही पवित्र माती आणण्यात आली. पण सध्या भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणलेले असल्याने हे सोपे नव्हते. कोणत्याही भारतीयाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी नाही. पण वेंकटेश रमन आणि जानकी या दांपत्याने हॉंगकॉंगमार्गे ही माती आणली.

वेंकटेश रमन आणि त्यांची पत्नी जानकी हे दांपत्य मूळचे कर्नाटकचे आहे. त्यांनीच पाकव्याप्त काश्मीरमधील शारदापीठातील माती राममंदिरासाठी आणली. हे दोघे चीनमध्ये राहतात. सेवा शारदापीठाने यांच्याशी संपर्क केला होता. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीयांना जाण्यास बंदी असल्याने वेंकटेश रमन आणि जानकी यांना चीनच्या पासपोर्टवर तिथे पाठवण्यात आले. हे दांपत्य हॉंगकॉंगमार्गे राजधानी मुजफ्फराबादला पोहोचले. तिथून शारदापीठात जाऊन तिथला प्रसाद आणि माती घेऊन ते दिल्लीला आले.

दिल्लीत शारदापीठाच्या सुपूर्द केली माती

या दाम्पत्याने सेवा शारदा पीठाचे सदस्य अंजना शर्मा यांच्याकडे ही माती आणि प्रसाद सुपूर्द केला. शर्मा यांनी सांगितले की ते शारदापीठाचे मुख्य पुजारी रवींद्र पंडित यांच्या आदेशावरून अयोध्येत आले आहेत. त्यांनी सोबत कर्नाटकातील अंजना पर्वताचे जलही आणले आहे. हा पर्वत हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे मानले जाते. त्यांनी सांगितले की या भूमीपूजनासाठी गोकर्णावरूनही पवित्र जल आणण्यात आले आहे. श्रीलंका आणि नेपाळवरून आणण्यात आलेल्या पवित्र माती आणि जलाचाही वापर इथे करण्यात आला आहे.

काश्मीरी पंडितांच्या तीन पवित्र स्थळांपैकी एक आहे शारदापीठ

पाकव्याप्त काश्मीरमधील शारदापीठ हे काश्मीरी पंडितांच्या तीन पवित्र स्थळांपैकी एक आहे. हे नीलम नदीच्या किनारी असून भारतातील उरीपासून जवळपास 70 किलोमीटरवर आहे.

शारदापीठाला पोहोचण्याचे दोन मार्ग

पाकव्याप्त काश्मीरमधील शारदापीठाला पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मुजफ्फराबादवरून तर दुसरा पूंछ-रावलकोटवरून. उरी ते मुजफ्फराबादचा मार्ग प्रचलित आहे. बहुतेक लोक इथूनच जातात.

पाकिस्तानने कॉरिडॉरला दिली होती मंजूरी

गेल्या वर्षी 25 मार्च रोजी पाकिस्तान सरकारने शारदापीठापर्यंतच्या एका कॉरिडॉरला मंजूरी दिली होती, जेणेकरून हिंदूंना तिथे दर्शनासाठी जाता येईल.

ग्लोबल न्युज नेटवर्क: