मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या राज्यातील डॉक्टर्सना शुभेच्छा

 

मुंबई | १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या काळातही तुमची सेवा, तुमचे समर्पण, तुमचे कौशल्य आम्हाला हवे आहे असे सांगून डॉक्टर्समुळेच कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणे शक्य झाले अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यवत केली.

सर्व डॉक्टर्सना उद्देशून दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, मागील वर्ष दीड वर्षांपासून आपण सगळे करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उतारावर उभे आहोत. आज काही प्रमाणात संसर्गाचे प्रमाण कमी झालेले दिसत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जातांना वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारीही अधिक वाढली आहे. आजपर्यंत कोविडचा लढा आपण लढलो ते तुम्हा डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या योद्ध्यांमुळे, आणि पुढे देखील हे आव्हान आपण पेलणार आहोत ते आपल्याच भक्कम साथीने असा विश्वास मला आहे.

कोविडची महामारी ही रोज घडणारी गोष्ट नसते. अशा घटना, अशी महामारी कित्येक वर्षातून एकदा येते आणि तिच्याशी झुंजताना तुमचा माझा सगळ्यांचा कस लागतो. सीमेवरील युद्ध वेगळं असतं. तिथं शत्रू आपल्या समोर असतो पण कोविडसारख्या रोगराईविरुध्दचे युद्ध ही वेगळी गोष्ट आहे. इथे शत्रू डोळयांनी दिसत देखील नाही आणि तरीही लढाई सुरू आहे. रुग्णांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळेतील चाचण्या रुग्णांवरील उपचार या सा-या बाबी जीवावर बाजी लावून आपण सारे करीत आहोत कारण हा अदृश्य शत्रू कधी कोणावर झडप घालेल हे सांगता येत नाही.

कोविडच्या या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत डॉक्टर म्हणून या कोविड विरोधी युद्धातील आघाडीचे योद्धे म्हणून आपण सर्वांनी जे मोलाचे योगदान दिले आहे, ते शब्दातीत आहे. मी मधल्या काळात आपणाशी वेगवेगळ्या निमित्ताने संवाद साधला आहे, आपल्या सूचना देखील ऐकून घेतल्या आहेत. डॉक्टर, मग ते सरकारी हॉस्पिटल मध्ये काम करणारे असोत की खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत, प्रत्येकाने जीवाची बाजी लावून आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. महाराष्ट्र ही लढाई तुमच्याशिवाय लढू शकत नव्हता आणि लढू शकणार नाही असे विधान सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केले होते.

Team Global News Marathi: