मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विधिमंडळात भाजपवर हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई : ‘‘दिल्लीत शेतकरी आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांची वीज कापली जाते, त्यांची शौचालये तोडली जात आहेत. पिण्याचा पाणीपुरवठा बंद केला जात आहे. शेतकरी सार्वभौम देशाच्या राजधानीत येऊ नयेत म्हणून त्यांच्या मार्गावर खिळे ठोकले जात आहेत.

शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकायचे आणि चीनचे सैन्य दिसले की पळत सुटायचे, अशी तुमची भूमिका आहे. चीन सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने देशात घुसखोरी केली नसती. या देशातील शेतकरी देशद्रोही आहे काय. हा देश तुमची खासगी मालमत्ता नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, हा देश आणि महाराष्ट्र तुमची खासगी मालमत्ता नाही. राज्यात शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात आहेत. पुढच्या वर्षी बाजारपेठेत कोणत्या पिकाला मार्केट असेल ते विचारात घेऊन दर्जेदार उत्पादन घेण्याला प्रोत्साहन दिले जाईल. राज्यात हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, यासाठी विकेल ते पिकेल ही योजना सुरू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्या प्रमाणात राबविणार आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना आणली गेली. ‘कॅग’ चा रिपोर्ट काय सांगतो पहा, कॅगच्या अहवालात जलयुक्त शिवार योजनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्या कॅगचा अहवाल मानायचा नाही आणि दुसरीकडे केंद्राचा आर्थिक पहाणी अहवाल आपण मानतो, हा दुटप्पीपणा आहे.’’

व्हायरस परत आला…
मी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे, काय करू नये, हे सांगितले. लोकांना विश्‍वास दिला. महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू घटक लागली, हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. काय करायचे काही नाही, याचा निर्णय घेतला जाईल. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणत कोरोनाच पुन्हा आला, असा टोलाही ठाकरे यांनी लगाविला. यावेळी सभागृहात हशा पिकला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उवाच…
आम्ही शिवभोजन थाळी पाच रुपयांमध्ये दिली, जी अजून सुरू आहे. भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरिबांना कळतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात केंद्राकडून दिरंगाई सुरू आहे. केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे ठेवले.

दरम्यान, सावरकरांना भारतरत्न द्या, यासाठी दोन वेळ पत्र दिले. भारतरत्न देण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. पण, दिला जात नाही. राज्याने देशात आणि जगात पहिले जम्बो हॉस्पिटल उभे केले, त्याचे सर्व तपशील आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: