मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या अशा शुभेच्छा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बंड पुकारुन सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अनेक वेळा उद्धव ठाकरेंवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला आहे. मात्र आज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पहिल्यांदाच शुभेच्छा व्यक्त केल्याचं दिसतंय. एकनाथ शिंदे यांनी ट्विटर हँडलवरुन ठाकरेंना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला आहे. ठाकरेंच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी आई जगदंबेच्या चरणी शिंदेंनी प्रार्थना केली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत परस्पर नवी जाहीर केली. त्याचप्रमाणे धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह शिवसेनेवर दावा सांगण्याचा प्रयत्नही शिंदेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी ठाकरेंचा ‘शिवसेना पक्षप्रमुख’ हा उल्लेख टाळणंं अपेक्षितच होतं.

“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना….” असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मुख्यमंत्रीपद मिळवले. आता जे काही बदनामीकरण चाललेय ते घाणेरडया, अश्लाघ्य आणि विकृत पद्धतीने चालले सुरु आहे. त्यामुळे हे सगळं कुणाला ‘लाभणारं नाहीय, असे वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत केले. एकनाथ शिंदे आता स्वत:ची तुलना शिवसेनाप्रमुखांबरोबर करायला लागले आहेत. ही ‘आमची शिवसेना’ असल्याचे म्हणत आहेत. हा अत्यंत घाणेरडा आणि दळभद्री प्रकार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: