छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासाचे शिखर पुरूष – नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली | छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेत. भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य देखील त्यांच्या अमरगाथेने प्रभावित झाले आहे. आपल्या या भूतकाळाचा, वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार केल्यावर एक प्रश्न पडतो, की छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आपले काय झाले असते?, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शताब्दी गौरव समारंभात काढले.

छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय भारताच्या सध्याच्या स्वरुपाची आणि भारताच्या गौरवाची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांबद्दल बाबासाहेबांना एवढी भक्ती आहे, असे पंतप्रधानांनी म्हणाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी दिल्लीतून विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी बाबासाहेबांनी जे योगदान दिले त्यासाठी आपण सर्वच त्यांचे ऋणी राहू. तसेच त्यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त देशाला त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली हे भाग्यच आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावे यासाठी मी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करतो, असा संदेशही मोदी यांनी दिला.

Team Global News Marathi: