केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ; वाचा सविस्तर-

ग्लोबल न्यूज- केंद्रीय लोकसेवा आयोगाने 5 जून 2020 रोजी प्रकाशित केलेल्या परीक्षेचा सुधारित कार्यक्रम/ वेळापत्रकानुसार देशभर 4 ऑक्टोबर 2020 (रविवार) रोजी भारतीय नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2020 (भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा,2020 यासह) आयोजित केली आहे.

नागरी सेवा (पूर्व) परीक्षा, 2020 (भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा, 2020 सह) साठी उमेदवारांची मोठी संख्या आणि केंद्रामध्ये बदल करण्याकरिता उमेदवारांकडून आलेले विनंती अर्ज लक्षात घेऊन आयोगाने उमेदवारांना त्यांच्या आधीच्या केंद्रात बदल करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

याव्यतिरिक्त, नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 आणि भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 साठीची केंद्रे बदलण्याचा पर्यायही उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

अतिरिक्त उमेदवारांना सामावून घेण्याच्या केंद्राच्या अतिरिक्त/वर्धित क्षमतेनुसारच उमेदवारांच्या केंद्रात बदल करण्याच्या विनंतीवर विचार केला जाणार आहे.

सुविधा आयोगाच्या https://upsconline.nic.in या संकेतस्थळावर दोन टप्प्यात म्हणजे 7 ते 13 जुलै, 2020 (संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत) आणि 20-24 जुलै, 2020 (संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत) या कालावधीत उमेदवारांना सुधारित निवड केंद्रे सादर करता येतील.

ज्या उमेदवारांना केंद्र निवडीत बदल करायचे आहेत त्यांनी संकेतस्थळाला भेट देऊन वरील परीक्षांच्या केंद्रांच्या निवडीत बदल करावेत, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रात बदल करण्याची त्यांची विनंती “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” या तत्त्वाच्या आधारे विचारात घेतली जाणार आहे. एकदा एखाद्या विशिष्ट केंद्राची क्षमता पूर्ण झाल्यानंतर ते केंद्र बंद केले जाईल.

ज्या उमेदवारांना कमाल मर्यादेमुळे त्यांच्या आवडीचे केंद्र मिळू शकत नाही त्यांनी उर्वरित केंद्रांमधून केंद्र निवडणे आवश्यक आहे.

नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 च्या परीक्षा सूचना क्रमांक. 05/2020-CSP दि. 12/02/2020 आणि भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 च्या परीक्षा सूचना क्रमांक. 06/2020-IFoS दि. 12/02/2020 मध्ये नमूद केलेल्या सर्व अटी आणि पात्रता यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेल्या नाही.

वरील विषया व्यतिरिक्त, आयोग 1 ते 8 ऑगस्ट, 2020 दरम्यान आयोगाचे संकेतस्थळ https://upsconline.nic.in वर उमेदवारांना अर्ज रद्द करण्याची विंडो देखील उपलब्ध करुन देणार आहे.

अर्ज मागे घेण्यासाठी, नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 च्या परीक्षा सूचना क्रमांक. 05/2020-CSP दि. 12/02/2020 आणि भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2020 च्या परीक्षा सूचना क्रमांक. 06/2020-IFoS दि. 12/02/2020 मध्ये नमूद केलेल्या सर्व अटी कायम आहेत.

उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की एकदा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यानंतर भविष्यात कोणत्याही परिस्थितीत तो अर्ज पुन्हा स्वीकारला जाणार नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: