केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात राष्ट्रवादी ताकदीने लढणार, राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांने घेतली शरद पवारांची भेट

 

महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आढावा बैठक पवारांच्या उपस्थितीत पार पडली. राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे काम होत असून याविरोधात पूर्ण ताकदीने लढण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.

आयकर विभाग, ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय एजन्सींचा वापर करून भाजप महाविकास आघाडी सरकारच्या प्रत्येक नेत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास देण्याचे काम करत आहे. यामुळे या सर्व गोष्टींना खंबीरपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. केंद्रसरकारने किंवा भाजपाने कितीही राष्ट्रवादीवर हल्ले केले किंवा केंद्रीय एजन्सींचा वापर केला तरी आमचे नेते किंवा कार्यकर्ता डगमगणार नाही, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

तसेच तिसऱ्या लाटेचा धोका कमी होत असून राज्यात संसर्गाचा धोका कमी होत असल्यामुळे दुकानाच्या वेळा वाढवण्याच्या मुद्द्यावर मलिक म्हणाले की, टाळेबंदीत व्यापाऱ्यांनी मोठे नुकसान सहन केले आहे. आता सणासुदीचे दिवस आहेत. आणखी त्यांचे नुकसान होऊ नये. कोरोनाचा धोका टळला आहे. व्यापाऱ्यांना आता दिलासा दिला पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भावना आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळा वाढवण्याची विनंती करण्यात येणार आहे.

 

Team Global News Marathi: