सावधान कोरोना वाढतोय: दोन आठवडे धोक्याचे; आरोग्य विभागाचा इशारा

दोन आठवडे धोक्याचे; आरोग्य विभागाचा इशारा

राज्यात कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक आकडेवारी दररोज समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने अहवाल सादर केला आहे. रुग्णवाढीचे प्रमाण असेच कायम राहिल्यास सध्याच्या मृत्यूदरानुसार दोन आठवडय़ांत कोरोनामुळे दररोज एक हजार लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

 

4 एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या तीन लाख पार जाईल तर कोरोना मृतांची एकूण संख्या 64 हजारांवर जाईल अशी भीती  वर्तविण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला.

राज्यात बुधवारी कोरोना रुग्णांचा 31 हजार 855 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात दुसर्यांदा 30 हजारांवर रुग्ण आढळले असून मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या दिवसाला 25 हजारांवर आहे. राज्यामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या सध्या 25 लाख 64 हजार 881 इतकी आहे. त्यापैकी दोन लाख 47 हजार 299 रुग्ण हे अॅक्टीव्ह रुग्ण म्हणजेच उपचार सुरु असणारे रुग्ण आहेत. सध्या मृतांची संख्या 53 हजार 684 इतकी आहे.

करोनावर मात करुन ठणठणीत झालेल्या, ताप नसलेल्या आणि शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण 95 टक्क्यांपर्यंत असणार्यांना कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरित करण्यात यावं. दर चार तासांनी सहा मिनिटांची चालण्याची चाचणी, ऑक्सिजनचं प्रमाण तपासून पाहणं यासारख्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत.

पुण्यातील ऑक्टिव्ह रुग्णसंख्या 61 हजारांवर जाणार

राज्यात सर्वाधिक रुग्ण पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये असतील. पुण्यामध्ये 61 हजार 125, नागपूरमध्ये 47 हजार 707 तर मुंबईत 32 हजार 927 अॅक्टीव्ह रुग्ण असतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. अनेक जिह्यांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा अपुर्या पडण्याची शक्यता असल्याचे अहवालात नमूत करण्यात आले आहे.

कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण आठवडय़ाला एका टक्क्याने वाढत आहे तर मृत्यूदर हा 2.27 टक्के आहे.  यानुसार पुढील दोन आठवडय़ांमध्ये राज्यामधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 28 लाख 24 हजार 382 इतकी होईल.

बेडची संख्या चार हजारांनी वाढवण्याची गरज

ऑक्सिजन सेवा असणाऱया बेड्सची संख्या चार हजारांनी वाढवण्याची गरज आरोग्य विभागाने व्यक्त केलीय. ठाणे आणि नागपूर या दोन जिह्यांतील बेडची संख्या वाढवली नाही तर परिस्थिती गंभीर होईल.  रुग्णांची संख्या पाहून त्या हिशेबाने वेगवेगळ्या ठिकाणी करोना बेड्सची संख्या निश्चित करण्यात यावी असे मत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी व्यक्त केले आहे.

 

स्टेट बँकेच्या रिसर्च टीमने तयार केलेल्या अहवालात कोरोनाची दुसरी लाट जवळपास शंभर दिवस भारतात राहील. त्यामुळे 15 फेब्रुवारी ही तारीख गृहित धरली तर मे पर्यंत या लाटेचा परिणाम पाहायला मिळू शकते. या अहवालानुसार एप्रिल- मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट जोरदार असणार आहे. 23 मार्चच्या कोरोना ट्रेन्डचा विचार करायचा झाला, तर देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 25 लाखापेक्षा जास्त लोक कोरोनाग्रस्त होऊ शकतात. अहवालानुसार, स्थानिक स्तरावर टाळेबंदीच्या निर्बंधांचा कुठलाही परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे लसीकरणावर भर आणि त्याचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक बाबींचा विचार करायचा झाला, तर गेल्या आठवड्यापासूनच इंडेक्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. काही राज्यात कडक टाळेबंदीच्या निर्णयाचे परिणाम पुढील महिन्यात दिसून येतील, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: