“मांजराची नक्कल करणारे आता मांजरासारखे लपून बसलेत” – दीपक केसरकर

 

मुंबई | भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेणा हल्ला नितेश राणे यांना भोवणार असल्याचे बोलले जात आहे. यातच सिंधुदुर्गातील शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे.

जे गुन्हेगार असतात ते सर्वांत जास्त पोलिसांना घाबरतात. प्रत्येक गुन्हेगार कायदा आणि पोलिसांना घाबरत असतो. कोणी गुन्हा केला हे मला माहिती नाही. पण शेवटी दुसऱ्याला चिडवायला जातो आणि म्याव म्याव करत असतो तेव्हा तेच करण्याची परिस्थती दैव आपल्यावर आणते हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपले वागणे चांगले ठेवले पाहिजे, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. ते सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते.

जे दुसऱ्यांना चिडवत असतात, त्यांच्यावर अशी वेळ ईश्वर कधी ना कधी आणत असतो. ते मांजराची नक्कल करत होते आणि आता तेच मांजरासारखे लपून बसले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. ते वाघाला घाबरतात की, न्यायालयाला हे माहिती नाही, पण घाबरत आहेत, हीदेखील वस्तुस्थिती आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली. आता या टीकेला राणे कुटुंबीय काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: