Breaking : लेडी सिंघम दिपाली चव्हाण यांची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या, सुसाईड नोट रहस्य उलगडणार?

धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय घरात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघड झाल्यानंतर तब्बल दीड तास कोणालाच घरात प्रवेश करु देण्यात न आल्याने उलट सुलट चर्चा सुरु होती.

रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्‍या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (वय – 28 वर्ष, मूळ राहणार- सातारा जिल्हा) यांनी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरूवार रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली.

दिपाली यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शासकीय बंदुकीतल्या गोळ्या स्वतःच्या छातीवर मारून घेतल्या, अशी माहिती आहे. त्या गर्भवती असल्याचीही माहिती समोर आली आहे. स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज परिचीतांनी वर्तविला आहे.

 

 

मिळालेल्या माहितीप्रमाणे, दिपालीला एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपालीला त्यांनी झापल्याची माहिती आहे. मृत्यूपूर्वी दिपाली यांनी सुसाईड नोट लिहून ठेवले आहे. त्यात काय लिहीले ते समजू शकलेले नाही.

घटनेच्या वेळी घरी कोणीच नव्हते, असे समजले आहे. दिपाली यांनी धुळघाट रेल्वे येथे असताना सालई डिंक तस्करांना नामोहरम केले होते. हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालुर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती.

सोमवारीच दिपाली यांनी प्रा. आ. केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस घेतली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार राजकुमार पटेल तथा उपविभागीय पोलिस अधिकारी संजय काळे पोचहलेले होते. आता पोलिस तपास सुरू आहे.

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून तात्काळ निलंबित करण्यात यावे. तसेच त्यांची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात यावी. अशी मागणी वनसंरक्षक मुख्य प्रधान नागपूर यांच्याकडे मानद सातारा वन्यजीव रक्षक मानद रोहन भाटे (शहा) यांनी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: