ब्रासबॅण्डच्या सुरात तिरंगा यात्रा, भारतमातेच्या जयजयकारात प्रभात फेरी!

 

ठाणे | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भाजपातर्फे ठाण्यात `हर घर तिरंगा’ उपक्रम अपूर्व उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेने नौपाड्यात ब्रास बॅण्डच्या सुरात काढलेली तिरंगा यात्रा, तर भारतमातेच्या जयजयकारात शालेय विद्यार्थ्यांनी काढलेल्या प्रभात फेरीने नौपाडा परिसर दुमदुमून गेला होता. त्याचबरोबर ठाण्यातील घरांघरांबाहेर तिरंगा डौलाने फडकत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात हर घर तिरंगा अभियान उत्साहात सुरू आहे. भाजपातर्फे क्रांतीदिनापासून सुरू झालेल्या कार्यक्रमानुसार ठिकठिकाणी तिरंगा यात्रा, बाईक रॅली, फ्लॅश मॉब, प्रतिष्ठित व्यक्तींना तिरंगा प्रदान आदी कार्यक्रम करण्यात आले. आजपासून घरोघर तिरंगा फडकविण्याच्या उपक्रमाला सुरूवात झाली. त्यानुसार ठाण्यातील घराघरांबाहेर, खिडकीत, बाल्कनीत तिरंगा फडकला.

भाजपा व विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि भाजयुमोच्या कोकण सहसंयोजिका कु. वृषाली वाघुले यांच्या वतीने रेल्वे स्टेशनबाहेरून आज भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ब्रासबॅण्डवर देशभक्तीपर गीते सुरू असतानाच, भारतमातेच्या जयजयकारात नागरिकांसह शेकडो रिक्षाचालकांनी तिरंगा यात्रा काढली. त्यानिमित्ताने रेल्वे स्टेशनचा परिसर तिरंगामय झाला होता. या यात्रेत आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, शहर चिटणीस जयेंद्र कोळी यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भाजपाच्या शैक्षणिक प्रकोष्ठचे अध्यक्ष सचिन बी. मोरे यांनी मल्हार टॉकीजसमोरून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढली. त्यात आर. जे. ठाकून महाविद्यालय, आदर्श इंग्लिश स्कूल, भारतरत्न इंदिरा गांधी शाळेचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करीत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रभात फेरीत सहभाग घेतले. या फेरीमध्ये आमदार डावखरे, संजय केळकर, माजी नगरसेवक सुनेश जोशी, सुजय पतकी, डॉ. राजेश मढवी आदी सहभागी झाले होते.

Team Global News Marathi: