बाळासाहेबांच्या मुलाला त्रास हा भाजपचा कृतघ्नपणा, नाना पटोले यांनी साधला निशाणा |

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर विरोधात बसलेल्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडी सरकारवर घणाघाती टीका करत अडचणी वाढवण्याचे काम केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला भाजप आता त्रास देत आहे, हा भाजपाचा कृतघ्नपणा आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहावत नसून त्यांची खुर्ची ओढण्याचा प्रयत्न ते करत आहेत अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रातूनही ते स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशार्‍यावरून विरोधकांवर दबाव आणण्याचे काम भाजप करत आहे. ED चा माध्यमातून विरोधकांना कसा त्रास दिला जातो, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व किरीट सोमय्या यांच्या बोलण्यातूनही वारंवार उघड झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे सरकार भक्कम आहे. सरकारच्या कामगिरीवर जनताही समाधानी आहे; परंतु सत्ता नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेला भाजप सीबीआय, ईडी, आयकर, एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्रास दिला जात आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न फेल गेले असून त्यांचा हा कुटील डावसुद्धा यशस्वी होणार नाही. सरकार पाच वर्षे चालेल,’ असा विश्‍वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

Team Global News Marathi: