भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई : धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत  महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करून भाजपच्या अमरिश पटेल यांनी विजय मिळविला आहे, त्यानंतर आघडी सरकारवर भाजपकडून जोरदार टीका केली गेली. भाजपच्या टीकेला काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे”, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये गेलेले अमरिश पटेल भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार होते.  अमरिश पटेल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याने महाविकास आघाडीला मोठं नुकसान सहन करावे लागले. शिरपूरचे अमरिश पटेल यांचा धुळे, नंदुरबार जिल्ह्यात चांगला प्रभाव आहे. अमरिश पटेल जिंकल्यावर भाजपकडून महाआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आले, त्यावरही अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“भाजपने मिळवलेला विजय हा दुसऱ्याच्या घरात चोरी करुन मिळवलेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरात चोरी करायची आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं अशातला हा प्रकार आहे. आम्हाला पाच जागा मिळतील आणि आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्ष टिकेल”, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

असे फिरले गणित… 

धुळे-नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीकडे २१३ सदस्यांची ताकद होती. तर भाजपकडे १९९ सदस्य होते. असं असतानाही अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीची मतं फोडण्यात यश मिळवलं. महाविकास आघाडीचे उमेदवार यांना केवळ ९८ मतं मिळाली. तर भाजपच्या अमरिश पटेल यांना तब्बल ३३२ मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी २३४ मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: