छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपा रोखणार 

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात चालू झाले असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.

पाटील म्हणाले की, राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या साथीने शिवसेनेचे सरकार नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्तेवर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते व त्यांच्यामुळे आज हिंदू समाज अस्तित्वात आहे. तरीही सध्याच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाच्या सोईने शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याचा घातक प्रयत्न सुरू झाला आहे. त्यातूनच राज्यातील विविध गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने निर्माण करण्यात येत आहेत.

ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड येथे मदार मोर्चा येथे रंगरंगोटी करून व चादर चढवून त्याचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याच्या विरोधात छत्रपती खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे स्थानिक शिवसेना आमदारांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले पण मा. संभाजीराजे यांनी आवाज उठवला. दुर्दैवाने राज्यात ठिकठिकाणी गडकिल्ल्यांवर असे प्रकार घडू लागले आहेत.

शिवनेरी गडावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक सिद्दी इब्राहिम खान उद्यान’ असा फलक लावला गेला. रत्नागिरी जिल्ह्यात महामार्गावर ‘शिवाजी महाराजांचे गुरुवर्य पीरसाहेब यांच्या स्थानाकडे’ असा बोर्ड झळकला. या प्रकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या की पोलीस ऐतिहासिक पुरावा मागतात आणि तक्रार घेत नाहीत. ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशिर्वादाने व पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: