भाजपाला नाशकात बसणार पुन्हा धक्का, आणखी एक बडा नेता समर्थकांसह सेनेत करणार प्रवेश
माजी आमदार आणि भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल हे दोघे आज शिवबंधन बांधणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची या दोघांनी काल रात्री उशिरा भेट घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. हा धक्का भाजप पचवत असताना सेना आणखी एका धक्का भाजपाला देण्याच्या तयारीत आहे.
वसंत गीते, सुनील बागुल यांच्या पाठोपाठ भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील हे सुद्धा सेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. दिनकर पाटील हे आपल्या ११ समर्थक नगरसेवकांसह शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपा अल्पमतात जाण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरु करत सेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षात प्रवेश दिला होता. त्यामुळे भाजपने खेळलेल्या खेळीला तोडीसतोड उत्तर देण्यासाठी सेनेने सुद्धा भाजपाला जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे. माजी आमदार वसंत गीते, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यापाठोपाठ दिनकर पाटील आपल्या चार समर्थक नगरसेवकांसह सेनेत प्रवेश करणार आहेत.
दिनकर पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही भेट घेतली होती. या भेटीमुळे पाटील सेनेत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. एवढेच नाही तर भाजपचे ११ नगरसेवक सेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.