भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने ‘अंत्योदय प्रतिष्ठान’ तर्फे रत्नागिरी येथे भव्य रुग्णालयाचे लोकार्पण

 

 

रत्नागिरी | अंत्योदय प्रतिष्ठान’च्या अधिपत्याखाली भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, आमदार श्री प्रसाद लाड आणि सौ. नीता प्रसाद लाड यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या रत्नागिरी येथील १२० बेडच्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालयाचा तसेच रत्नागिरी येथील ४ व सिंधुदुर्ग येथील ३ कोविड केंद्रांचा लोकार्पण सोहळा ८ आणि ९ सप्टेंबर २०२१ रोजी होत आहे. या सुविधांमुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील आरोग्य सुविधा भक्कम होणार असून त्यामुळे कोविड-१९च्या काळात नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

रत्नागिरी येथील पारकर हॉस्पिटल येथे १२० नवीन बेडची सुविधा उभारली गेली असून त्यांमध्ये ४० सर्वसाधारण, ४० कोविड, २० आयसीयू आणि २० लहान मुलांच्या बेडचा समावेश आहे. या रुग्णालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार निलेश राणे, माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, आमदार भाई गिरकर, आमदार नितेश राणे हे मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

त्याशिवाय ८ सप्टेंबर २०२१ रोजी रत्नागिरी येथे ४ कोविड केंद्रांचे उद्घाटन होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर २०२१ रोजी सिंधुदुर्ग येथे ३ कोविड केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. रत्नागिरी येथील ही केंद्रे आबासाहेब मराठे हायस्कूल हातीवले, राजापूर; खंडाळा हायस्कूल, रत्नागिरी; महात्मा गांधी विद्यालय, साखरपा; लोकमान्य टिळक विद्यालय, दाभोळ या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्ग येथील केंद्रे आयुर्वेदिक कॉलेज, सावंतवाडी; ग्रामीण रुग्णालय, देवगड; पॉलीटेक्निकल कॉलेज, मालवण येथे उभारली गेली आहेत.

Team Global News Marathi: