भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून जाहीर निषेध !

मंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भुजबळांना इशारा दिला होता. जास्त बोलू नका तुम्ही जामिनावर बाहेर आहे असे वक्तव्य करत थेट इशारा दिला होता. याच वक्तव्याचा आता राष्ट्रवादीकडून निषेध नोंदवण्यात आला आहे. पाटील यांचे वक्तव्य देशातील न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करणारे असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली.

ठाकरे म्हणाले, की पाच राज्यांच्या निवडणुकीत आसाम वगळता भाजपला जनतेने नाकारले असताना पराभव जिव्हारी लागल्याने पाटील यांनी भुजबळ यांच्यावर बेतालपणे वक्तव्य करून उघड धमकी देण्याचा प्रकार आहे. लोकशाही व्यवस्थेला हा प्रकार घातक आहे. ज्यांना जनतेने सपशेलपणे नाकारले असताना त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार शिल्लक राहत नाही असे विधान त्यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भुजबळ यांनी न्यायव्यवस्थेचा नेहमी आदर केला. आपला न्यायालयीन लढा कायदेशीररीत्या लढत आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा पाटील यांना कुठलाही अधिकार नाही. तरीसुद्धा हुकूमशाही पद्धतीने न्यायव्यवस्था आपल्या खिशात असल्यासारखे त्यांचे वागणे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.

याआधी देशातील जनतेने सीबीआय, ईडी यासह सरकारी यंत्रणांचा राजकीय फायद्यापोटी वापर करताना बघितले आहे. सीबीआय, ईडीचा राजकीय वापर केला जातोय का? न्यायदेवता त्यांच्या हातात आहे काय, असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाल्याने या हुकूमशाही वृत्तीला जनतेने नाकारण्यास सुरवात केली आहे.

Team Global News Marathi: