भाजपा तर्फे राज्यात ५ ऑगस्ट पासून स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान वैद्यकीय आघाडीचे डॉ. गोपछडे यांची माहिती

 

भाजपातर्फे संपूर्ण देशभर राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्रात उद्या, ५ ऑगस्टपासून या अभियानाचा प्रारंभ होत असून या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते ४४ हजार पेक्षा अधिक खेड्यांपर्यंत जाऊन कोरोना रोखण्याच्या आणि आरोग्य, स्वच्छता जागृतीच्या कामात आपले योगदान देतील, अशी माहिती या अभियानाचे संयोजक व भाजपा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांनी बुधवारी दिली.

डॉ. गोपछडे यांनी सांगितले की ५ ऑगस्ट रोजी या अभियानाचा प्रारंभ दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात होणार असून या कार्यक्रमाला प्रदेश प्रभारी सी. टी. रवी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत.

सत्ता हे ध्येय नसून जनतेच्या सेवेसाठी आम्ही राजकारणात आहोत या भूमिकेतून हे अभियान सुरु करण्यात आले आहे. भाजपाचे स्वास्थ्य स्वयंसेवक खेडोपाडी जाऊन कोरोना विषयी व एकूणच आरोग्य, स्वच्छता या विषयी जागृती निर्माण करतील. या अभियानात जिल्हा स्तरावर स्वयंसेवकांचे गट तयार करण्यात येणार आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळलेल्या रुग्णांना तातडीने उपचार देण्याचे काम स्वयंसेवक करतील. प्रत्येक स्वयंसेवकाजवळ हेल्थ किट दिले जाणार आहे. त्यात ऑक्सीमिटर, थर्मामीटर , रॅपिड अँटीजेन चाचणी साहित्य तसेच प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचा समावेश असेल, अशी माहिती डॉ. गोपछडे यांनी दिली.

डॉ. गोपछडे यांनी सांगितले की, मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये पक्षाने ‘सेवा ही संघटन’ अभियान राबवले. या अभियानात गोरगरीब जनतेला अन्नदान, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना आवश्यक ती मदत केली गेली. या अभियानाचा पुढचा भाग म्हणून राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांसाठी प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: