भाजप की शिवसेना गद्दारी नक्की कुणी कुणाशी केली; वाचा सविस्तर- भाजपने शिवसेनेला

काल चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेवर गद्दारी केल्याचा आरोप केला..

भाजप की शिवसेना गद्दारी नक्की कुणी कुणाशी केली; वाचा सविस्तर-

भाजपने शिवसेनेला फसवल्याचा इतिहास…

ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्रच्या विधानसभेची निवडणूक झाली. भाजपला १०५ जागा, शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादीला ५४जागा, कॉंग्रेसला ४४ जागा आणि इतरांना काही जागा मिळाल्या. भाजप – शिवसेना युती करून निवडणूक लढले होते. त्या मुळे भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना खात्री होती की आपला म्हणजे मीच मुख्यमंत्री होईल आणि गेल्या५ वर्षाप्रमाणे शिवसेनेला फारसं महत्व न देता आपण सरकार चालवू. शिवसेना आपल्याशिवाय कुठेच जावू शकत नाही. शिवसेना तयार झाली नाही तर राष्ट्रवादी आहेच, गेल्या वेळेप्रमाणे बाहेरून पाठिंबा द्यायला. परंतु उद्धव ठाकरेंनी निकालाच्या दुसर्‍या दिवशी जाहीर केलं की युती सरकारमध्ये आम्हाला सत्तेत समान वाटा पाहिजे, आमचं अमित शहा यांच्या बरोबर ठरले आहे, आम्हाला सुद्धा अडीच वर्षे मुख्यमंत्री पाहिजे. अन्यथा आमच्याकडे दूसरा पर्याय आहे.

भाजपला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल की असे काही होईल. काही अपक्षांच्या मदतीने 116 पर्यन्त आकडा भाजपचा होत होता. त्या पुढे काही त्यांची गाडी सरकायला तयार नव्हती. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस बरोबर बोलणी सुरू केली. यात प्रामुख्याने संजय राऊत आणि जेष्ठ नेते शरद पवारांनी पुढाकार घेतला. मग भाजपला कळून चुकलं की आता आपलं सरकार काही येत नाही. तरी सुद्धा त्यांनी राज्यपाल कोशारींच्या मदतीने शेवट पर्यन्त प्रयत्न केले. परंतु ते सर्व निष्फळ ठरले. किंवा असे म्हणता येईल की पवारांसारख्या जेष्ठ आणि मुत्सदी नेत्याने मोदी – शहा – फडणवीस – कोशारी यांच्यावर मात केली.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे सरकार स्थापन झाले. सवयी प्रमाणे भाजप नेते शिवसेनेने गद्दारी केली , आम्हालाच जनाधार मिळाला आहे असे सांगायला सुरवात केली. फडणवीस तर मीच कायमचा मुख्यमंत्री असे स्वत:च्या फेसबुकवर लिहू लागले.

हे असे का झाले…..? 30 वर्षाची युती अशी कशी तुटली…? कॉंग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाबरोबर वैचारिक मतभेद असूनही त्यांच्या बरोबर शिवसेना का गेली…? भाजपला खरच धोका दिला का …?
लक्षात घ्या. शिवसेनेने गद्दारी केली नाही… उलट भाजपनेच त्यांच्याशी गद्दारी केली. भाजपला प्रादेशिक पक्ष संपवून स्वबळावर सरकार आणायचे आहे. शिवसेना हाच त्यांचा प्रमुख शत्रू आहे. दूसरा हिंदुत्ववादी पक्ष त्यांना नकोय. त्या साठी ते वाट्टेल ते करण्यास मागे पुढे पाहत नाहीत.

नुकत्याच बिहारच्या निवडणुकीत संघातील अनेकांना स्व. रामविलास पासवाण यांच्या पक्षातून नितीश कुमारांच्या पक्षा विरुद्ध उभे केले. नितीश कुमारांच्या जागा कमी होतील याची काळजी घेतली. त्यांच्या बरोबर युती करून सुद्धा त्यांना धोका दिला. हे सर्व देशाने बघितलंय.‌..असो..

आता शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमागील कारणे बघू.

 २०१४ला भाजपने शिवसेनेबरोबर शेवटच्या क्षणी युती तोडली. १६ अॉक्टोबरला मतदान होते आणि २५ सप्टेंबरला अगदी शेवटच्या क्षणी शिवसेनेला गाफिल ठेवून भाजपने त्यांच्या बरोबर असलेली ३० वर्षाची युती तोडली. मग गद्दारी कुणी केली..?

 १९ ऑक्टोबर २०१४ला निकाल लागला आणि दुसर्‍या दिवशी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचे जाहीर केले. भाजपने प्रत्यक्षपणे पाठिंबा घेतला नाही आणि नाकारला ही नाही. १२२ आमदारांच्या भाजपने सरकार बनविले. राष्ट्रवादीच्या मदतीने आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध केलेल भाजपने. शिवसेनेला सहा महीने सरकार बाहेर ठेवले.६ महीने अप्रत्यक्षपणे भाजपने राष्ट्रवादीचा पाठींबा घेतला.

भाजपने एकत्र सत्तेत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांना कधीच विश्वासात घेतले नाही. शेतकरी कर्ज माफी असो किंवा मराठा आरक्षण नाहीतर जलयुक्त शिवार सारखी योजना. शिवसेनेच्या मंत्र्यांना सतत दुय्यम वागणूक दिली.

 २०१४ ते २०१९ या पाच वर्षात जे काही केले ते सर्व भाजपने केले, त्यातही फडणवीसांनी केले अशी सारखी जाहिरात केली. युती सरकार ऐवजी फडणवीस सरकार असाच उल्लेख सतत केला. शिवसेनेचे सरकारमध्ये अस्तित्व आहे की नाही अशी शंका जनतेला येईल इथपर्यंत स्वत:ची जाहिरात केली.

 शिवसेनेचे १८ खासदार असतानाही केंद्रात कमी दर्जाचे मंत्रिपद दिले. भाजपा आघाडीतील सर्वात जास्त जागा १८ शिवसेनेने जिंकल्या. तरी त्यांना अवजड उद्दोग मंत्रालय सारखे कमी दर्जाचे मंत्रिपद दिले. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाने ६ जागा जिंकल्या तरी त्यांना अन्न व वितरण खाते देण्यात आले. शिरोमणि अकाली दलाचे ४ खासदार असताना त्यांना अन्न प्रक्रिया करणार्‍या खात्याचे मंत्रिपद दिले. एकही खासदार नसलेल्या रामदास आठवलेंना सामाजिक खात्याचे मंत्रिपद दिले. शिवसेनेचा या पेक्षा जास्त अपमान कधी कुणी केला नाही

 गेली ६ वर्षे उद्धव ठाकरेंचा सतत अपमान केला. अनेक महत्वाच्या कार्यक्रमाला / उद्घाटनाला त्यांना बोलावले नाही. मोदींच्या हस्ते मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमीपूजन व ठाणे – भिवंडी – कल्याण , दहिसर – मीरा भाईंदर या दोन मेट्रो रेल्वे मार्गाच्या उदघाटनाप्रसंगी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिले नाही. कारण शिवसेनेला खाली दाखवायचे होते आणि आपणच सगळे करतो असे भाजपला भासवायचे होते. ३५ वर्षे यांचे प्रमुख नेते मातोश्रीवर जात होते त्यांचाच असा अपमान करण्यात मोदी फडणवीसांना आनंद वाटत होता.

 मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किरीट सोमय्या व शेलार यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेवर खालच्या पद्धतीने टीका केली. विशेष म्हणजे राज्यात आणि मुंबईत शिवसेनेबरोबर सत्तेत असूनही अशी टीका केली. मुंबई मनपा मध्ये माफिया राज चालू आहे आणि त्याचे सुत्रधार बांद्राला असतात अश्या आशयाची टीका केली. मुंबई महापालिकेतल्या रस्ते, नालेसफाई, टॅबलेट घोटाळ्याच्या चौकशी अहवालावरून भाजपने शिवसेनेवर आरोप सुरू केलेले असतानाच, या घोटाळ्यांचे सूत्रधार हे वांद्र्याचे साहेब, त्यांचे मेहुणे आणि त्यांचा खासगी सचिव आहे, असा आरोप करून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी खळबळ उडवून दिली. सोमय्या आणि त्यांचे सहकारी हे विसरले की हे सुद्धा गेली २० वर्षे ते सुद्धा मनपमध्ये सत्तेत होते. माफियाराज आणि भ्रष्टाचार झाला तरी २० वर्षात भाजपने एकदाही त्यावर तोंड उघडले नाही.

 देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून त्यांना शिवसेनेला शह द्यायचा होता. परंतु शिवसेनेने त्याला कडाडून विरोध केला. कॉंग्रेसने सुद्धा त्यांना साथ दिली. उदाहरण द्यायचे झाले तर मुंबई महानगर पालिकेच्या हद्दीत रस्त्यांवरील लाइट बदलून एल ई डी बल्ब मध्ये रूपांतर करण्याची योजना राज्य शासनामार्फत आशीष शेलारांनी जाहीर केली. वास्तविक पाहता हे काम मुंबई महानगर पालिकेचे आहे. परंतु राज्य शासनाला महानगर पालिकेच्या अधिकारात ढवळाढवळ करून काही गोष्टी आपल्या मार्फत करायच्या होत्या

 भाजपने महानगरपालिका, ग्राम पंचायत व जिल्हापरिषद निवडणुकीत सेनेला संपविण्याचा प्रयत्न केला. या निवडणुका भाजपाने स्वत:च्या बळावर लढवल्या. पूर्वी ते शिवसेनेला बरोबर घेवून लढवायचे. त्यांनी ह्या निवडणुका पक्षाच्या बळावर लढवल्या जाव्यात किंवा एक हाती फडणवीसांच्या नेतृत्वाखाली जिंकण्यासाठी ४वॉर्डचा एक प्रभाग करून घेतल्या. त्या मुळे बर्‍याच भागात शिवसेना ४ क्रमांकावर आली.

 भाजपने शिवसेनेला २०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीत ५० टक्के जागा देतो सांगून कमी जागा दिल्या. इतर सहयोगी पक्षांच्या जागा सुद्धा सहयोगी पक्षांना फसवून भाजपने घेतल्या. २८८ मतदारसंघात मित्रपक्षांसह भाजपच्या कमळावर तब्बल 164 अधिकृत उमेदवारांनी भाजपच्या बी फॉर्म वर उमेदवारी अर्ज भरला आहे. मित्रपक्षांना जागा सोडल्या असल्या तरी त्यापैकीही बहुतांश ठिकाणी उमेदवार भाजपनेच ठरवला आहे.

२०१९च्या निवडणुकीत भाजपने युती असूनही सेनेच्या उमेदवारच्या विरुद्ध प्रचार केला. बंडखोर निवडून आणले. बार्शीचे दिलीप सोपल शिवसेनेतून उभे होते. त्यांच्या विरुद्ध भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत हे विजयी झाले. उरण मतदारसंघात भाजप बंडखोर महेश बालदी यांना शिवसेना उमेदवार मनोहर भोईर यांच्या विरोधात भाजपने निवडून आणले. कागल मतदार संघात मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे असलेले समरजित घाटगे यांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. संजय घाडगे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असूनही समरजित घाडगे उभे राहिले.

आता प्रश्न असा पडतो की शिवसेनेने गद्दारी केली की भाजपने..? भाजपने नुसती गद्दारी केली नाही तर साम दाम दंड भेद याचा वापर करून सेनेला संपविण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने युती तोडली नसती तर पुढच्या निवडणुकीपर्यंत भाजपने त्यांना 10 ते 20 आमदारांवर आणले असते. मुंबई – ठाणे येथील मनपामध्ये त्यांना विरोधी बाकावर बसायला लावले असते. इडी मागे लावून किंवा पैसे देवून सेनेच्या अनेक नेत्यांना आपल्या पक्षात ओढले असते. काहीही खोटे नाटे आरोप करून सेनेला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला असता.

भाजप सोबत न जाता कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर सत्ता स्थापन करण्याची शिवसेनेने अतिशय योग्य भूमिका घेतली.
ही सत्तेची नाही तर अस्तित्वाची लढाई ठरली आणि त्यात उद्धव ठाकरेंच्या चाणाक्ष नेतृत्वाने भाजपवर मात केली.

धन्यवाद ..!

✍️ – हेमंत पाटील, राजकीय विश्लेषक , पुणे !!

ग्लोबल न्युज नेटवर्क: