सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या आमदार-खासदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सोलापूर : केंद्र शासन व राज्य शासनामार्फत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन पुरवठा व कोव्हिड लसींचा पुरवठा पुणे विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. सोलापुर जिल्ह्यावर रेमडेसिवीर इंजेक्शन,ऑक्सिजन,रॅपीड अँटीजन किट व कोविड लस यांच्या वितरणाबाबत प्रशासनाकडुन होत असलेल्या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय सोलापुर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदारांनी (BJP MPs and MLAs) गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.

या वेळी “या सरकारचं करायचं काय, खाली मुंडी वरती पाय…’ यासह राज्य सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. या वेळी खासदार जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार राजाभाऊ राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, आमदार राम सातपुते, राजू सुपाते, संतोष पाटील आदींनी उपोषणात सहभाग घेतला.

यानंतर दुपारी सर्व आमदार व खासदारांनी पायी चालत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

 

भाजप आमदार व खासदारांनी राज्य सरकारवर आरोप केले, की 12 एप्रिल 2021 ते 10 मे 2021 या कालावधीमध्ये पुणे विभागासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन व कोव्हिड लस पुरवठा करताना पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यावर वितरणाबाबत अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन दिली जात नाहीत. ऑक्‍सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत केला जात नाही.

कोव्हिड लसही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही. टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जातो. याउलट पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यास जास्त प्रमाणात झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोटा इतर जिल्ह्यांना दिला जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णसंख्या वाढत असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदरामध्ये झालेला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: