भाजपचे बडे नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात; लवकरच प्रवेश करणार ; गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

भाजपचे बडे नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात; लवकरच प्रवेश करणार ; गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

वर्धा : भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संर्पकात आहेत. लवकरच येत्या काळात त्यांचा महाविकास आघाडीत प्रवेश होईल, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील इनकमिंगबाबत चर्चा होती.तर आता गृहमंत्र्यांनीच भाजपमधून अनेकांचे पक्षप्रवेश होणार असल्याचे संकेत दिले आहेत. अनिल देशमुख यांच्या या दाव्यामुळे भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.

अनिल देशमुख यांनी आज वर्ध्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे.पुणे, नागपूर, अमरावती किंवा वर्धा असो प्रत्येक जिल्ह्यात आता पुढील काळात तुम्ही पाहाल, भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात देखील हे नेते आहेत. काही दिवसांत तुम्हाला नावे माहित पडतील. हे बडे नेते महाविकास आघाडीत येणार आहेत. त्यामुळे येत्या काळात मोठा पक्षप्रवेश महाविकास आघाडीत होणार असल्याचा दावा, अनिल देशमुख यांनी केला आहे.

दरम्यान, एकीकडे अनिल देशमुख यांनी हा दावा केलेला असतानाच भाजपकडून देखील असा दावा करण्यात आला आहे. पुण्यातील १९ नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा काल दिवसभर होती. मात्र ही चर्चा वायफळ असून कुणी कुठेही जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. उलट भाजपमध्येच काही लोक येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले होते. मात्र भाजपमध्ये जाणारे नेते नेमके कोण? आणि महाविकास आघाडीच्या संपर्कात असलेले भाजपचे ते बडे नेते नेमके कोण? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: