शिवसेनेला मोठा धक्का; मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील ?

शिवसेनेला मोठा धक्का; मंत्री उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील ?

आमदारांच्या बंडखोरीमुळे हैराण झालेल्या शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. कारण शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेदेखील बंडखोर गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे आठवे मंत्री आहेत.

आमदारांना मिळणाऱ्या निधीपासून हिंदुत्वाच्या विचारधारेपर्यंत विविध कारणे देत शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंड केलं आहे. हे सर्व बंडखोर आमदार आधी सूरत आणि त्यानंतर आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत युती करावी, अशी या आमदारांची मागणी आहे.

मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर शिवसेनेच्या उर्वरित नेत्यांसह रस्त्यावर उतरत या बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आपला रोष व्यक्त करत आहेत. मुंबईत शिवसेनेकडून विविध मिळावेही घेतले जात आहेत. मात्र एकीकडे हे मेळावे सुरू असताना दुसरीकडे पक्षातील गळती मात्र थांबण्याचं नाव घेत नसल्याची स्थिती आहे.

उदय सामंत यांचं फ्लाईट तिकिट समोर आलं आहे. ते सध्या सुरतहून निघाले असून लवकरच गुवाहाटीमध्ये पोहोचणार असल्याचं सांगितलं जात आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असणार आहे. उदय सामंत उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय होते. सोबत शिवसेनेच्या बैठकांलाही ते उपस्थित होते. त्यामुळे त्यांचं शिंदे गटात सामील होणं, शिवसेनेसाठी नक्कीच अनपेक्षित होतं.

शिवसेनेतील नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गायब झाल्यानंतरही उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याबाबतही कुजबूज सुरू झाली होती. अखेर आज ते गुवाहाटीकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

दरम्यान राज्यपाल हॉस्पिटलमधून राजभवनात परतताच भारतीय जनता पक्ष (BJP) सक्रीय झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज (रविवार) पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. फडणवीस गेल्या काही दिवसांमध्ये चौथ्यांदा दिल्लीला जाणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात ते भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: