सायकल दुरुस्ती करणाऱ्या काकांचा मुलगा बनणार न्यायाधीश

पुणे | सायकल दुरुस्तीचे दुकान चालविणारे श्रीधर काळे यांच्या मुलाने न्यायाधिश होण्यासाठीच्या परिक्षेत यश मिळवले आहे. ऍड. रवि श्रीधर काळे यांनी त्यांच्या आईची अंतिम इच्छा पूर्ण केली, नुकतेच न्यायाधीश परीक्षेच्या निकालात प्राविण्य मिळवत त्यांची निवड झाली असून एक वर्षाच्या ट्रेनिंगनंतर त्यांना न्यायाधीश म्हणून काम करण्याचा मान मिळणार आहे.

गुलटेकडी वसाहतीमध्ये राहत असताना गरिबीमुळे आयुष्यात जगण्याची, पोट भरण्याची दररोजची लढाई असल्याने अशा बिकट परिस्थितीवर मात करीत ऍड. रवि काळे यांनी कायद्याचे शिक्षण प्राप्त करीत न्यायाधीश पदापर्यंत यश संपादन केले आहे. ऍड. रवी काळे यांचे वडील मूळचे अहमदनगर येथील श्रीगोंदा गावचे आहेत.

काळे परिवार १९६८ मध्ये गुलटेकडी वसाहतीत रोजगारासाठी आले. चहाची टपरी ते सायकल दुरुस्तीचे काम अशा कामांतून अल्प उत्पन्नात तीन मुले व दोन मुलींचा सांभाळ केला, त्यांच्या पत्नीचे २००५ मध्ये निधन झाल्यानंतर खचून न जाता त्यांनी पाचही मुलांना उच्चशिक्षित केले.

रवि यांना कायदा तसेच याविषयक ज्ञानाकडे सुरवातीपासूनच ओढा होता. रवि मोठा जज्‌ हो लई सन्मान मिळल, असे त्यांची आई म्हणायची. आईचे हे शब्दच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे ऍड. रवि सांगतात. मृत्यू नंतर आईचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद वाटतो, असेही ऍड. रवि काळे भावुक होऊन सांगतात.वकिल होताच पहिल्या वर्षी सायकलवर न्यायालयात गेलो.

Team Global News Marathi: