“भाजपला वीर सावरकर किती कळलेत? घरभेद्यांकडूनच सगळ्यात जास्त अपमान”

 

एकीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असून, त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. यातच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून वीर सावरकर यांच्याबद्दल केल्या जात असलेल्या आरोप-प्रत्यारोपांचा समाचार घेण्यात आलेला आहे. राहुल गांधींनी काही वक्तव्य केले की, भाजपवाल्यांना सावरकरांचे स्मरण होते. तथाकथित माफी प्रकरणाचा रिकामा खुळखुळा वाजवत बसण्यापेक्षा सावकरांचे हिंदुत्व, हिंदू राष्ट्राचा विचार, हिंदुत्वाबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन, सैनिकीकरणावरील भर यावर देशातील प्रत्येक विद्यापीठात अध्यासन असायला हवे. सावरकरांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगून जे सत्तेवर आले त्यांनी तरी या दीपस्तंभाचा काय सन्मान केला? फक्त राहुल गांधींना दोष देऊन काय फायदा? घरभेद्यांनीच सावरकरांचा सगळ्यांत जास्त अपमान केला, अशी घणाघाती टीका शिवसेनेने केली आहे.

काँग्रेसने वीर सावरकरांचा खुळखुळा केला आहे तर भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्यवीरांचे खेळणे केले आहे. काँग्रेस सावरकरांचा अपमान करीत असते व त्या अपमानाबद्दल भाजपवाले जाब वगैरे विचारत असतात. आताही महाराष्ट्राचे (उप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीर सावरकर यांच्या राहुल गांधीकृत अपमानावर संताप व्यक्त केला. सावरकरांच्या अपमानाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त करणे समजण्यासारखे आहे. आम्हीही यासंदर्भातील आमची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली आहे, पण फडणवीसांच्या संतप्त भावना खऱ्या आहेत काय? भारतीय जनता पक्षाला तरी स्वातंत्र्य लढ्यातील वीर सावरकर किती कळले, अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

मोदी सरकारने दिल्लीचे रूपडे पालटायचा चंग बांधला आहे. आताच राजपथाचे नामांतर ‘कर्तव्यपथ’ केले व त्याचा भव्य सोहळा पार पडला. त्याऐवजी ‘वीर सावरकर कर्तव्यपथ’ असे नाव देऊन आम्ही सावरकरांच्या मार्गाने कर्तव्यपथावरून पुढे जात आहोत हे जगाला दाखवता आले असते, पण नेहमीप्रमाणेच सावरकरांचा विसर पडला. कर्तव्यपथावर नेताजींचा भव्य पुतळा उभारला तसा वीर सावरकरांचा पुतळा उभारायलाही हरकत नव्हती, असे सांगत भाजपवाल्यांना वीर सावरकर कळले असते तर सावरकरांचा सन्मान व्हावा यासाठी त्यांनी नक्कीच पावले उचलली असती. गेल्या आठ वर्षांपासून वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करावे, अशी मागणी शिवसेना करीत आहे.

Team Global News Marathi: