भाजप आमदाराने विधानसभेत तक्रार केलेल्या तेजस्वी सातपुतेंची बदली

 

सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची अचानकपणे झालेली बदली सोलापूर पोलीस दलाला धक्कादायक ठरली आहे. तीन वर्षे पूर्ण होण्याअगोदरच तेजस्वी सातपुते यांची बदली करण्यात आली आहे. तेजस्वी सातपुते यांच्या जागी नाशिक पोलीस अकॅडमी मधील शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. शिंदे फडणवीस सरकारने 20 ऑक्टोबर रोजी रात्री राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे परिपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये सोलापूर ग्रामीणच्या तेजस्वी सातपुते यांची देखील बदली झाल्याचे समोर आले आहे.

तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीणमध्ये चांगले काम केले असून, त्यांनी राबवलेल्या ऑपरेशन परिवर्तनमुळे सोलापूर पोलीस दलाचा उल्लेख लोकसभेत झाला होता, परंतु भाजपा आमदारांनी खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे राज्याच्या विधानसभेत सोलापूर पोलिसांविरोधात लक्षवेधी सूचना मांडल्या होत्या. यानंतर त्या बऱ्याच चर्चेत आल्या होत्या.

तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यात असताना देखील मोठ्या प्रमाणात काम केले होते. सातारा येथे दीड वर्षे ड्युटी करून कोरोना महामारीत पोलिसांसाठी अतिशय कमी वेळेत म्हणजेच 5 दिवसांत जंबो ऑक्सिजन कोविड सेंटर देखील सातपुते यांनी उभा केले होते. यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये तेजस्वी सातपुते या सोलापूर पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या होत्या. मात्र, 2 वर्षानंतरचं ऐन दिवाळीच्या तोंडावर तेजस्वी सातपुते यांची तडकाफडकी बदली झाली आहे.

Team Global News Marathi: