पंढरीत भीमा 2 लाख 87 हजार तर नृसिंहपूरमध्ये 2 लाख 55 हजार क्युसेकने वाहतेय, पंढरपुरात अनेक भागात पाणी
(तांबडा मारुती चौक)
पंढरपूर- उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग 1 लाख 20 हजार क्युसेक इतका कमी करण्यात आला आहे. दरम्यान वीरचा विसर्ग ही मंदावला आहे. दरम्यान भीमानदी नृसिंहपूर संगम येथे 2 लाख 55 हजार तर पंढरपूरमध्ये 2 लाख 87 हजार क्युसेकने वाहत आाहे. भीमाकाठी अनेक ठिकाणी पुराच्या पाणी शिरले आहे. पंढरपूर शहरातील सखल भागात पाणी आहे. प्रशासन सर्वच स्थितीवर लक्ष ठेवून असून रेस्न्यू टीम ही येथे काम पाहात आहेत.
(बचाव पथकं तैनात)
दरम्यान बचाव पथकं पंढरपूर शहरातील नाथ चौक, डॉ. आंबेडकर नगर, काळा मारूती येथे तर ग्रामीण मध्ये कौठाळीत तैनात होत आहेत. एक पथक राखीव ठेवण्यात आल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
(नवीन पुलावर चार फूट पाणी)
दरम्यान उजनीत दौंडजवळून मिसळणारी आवक ही कमी होवून ती आता 49 हजार क्युसेक झाली आहे. गुरूवारी रात्रौ हीच आवक 73 हजार क्युसेक होती तर पावसाचे प्रमाण देखील काल कमी होते. बुधवारी उजनी व वीरमधून मिळून जे तीन लाख क्युसेकच्या आसपास पाणी सोडले गेले होते. याचा परिणाम आता भीमाकाठी दिसत आहे. हे पाणी हळूहळू पुढे सरकत आहे. पंढरपूरमध्ये रात्रीपासून पाण्याच्या पातळीत वाढ झाली व पूररेषत अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. रात्री अनेक भागात स्थानिक लोक पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान आता उजनी व रात्रीपासूनच वीरचे पाणी कमी केल्याने येत्या काळात पाणीपातळी कमी होण्यास सुरूवात होईल. दरम्यान पाऊसही आता मंदावला आहे. पंढरपूरमध्ये भीमा नदीचा 2 लाख 87 हजार क्युसेक विसर्ग हा बराच काळ स्थिर आहे.
(नरवीर तानाजी चौक)
शहरातील नदीकाठच्या वसाहतीसह घोंगडे गल्ली, भजनदास चौक, मुक्ताबाई मठ परिसर, खिस्ते गल्ली, छत्रपती संभाजी महाराज चौक, नरवीर तानाजी चौक, म.फुले चौक, गोपाळपूर रस्ता, सांगोला रस्ता यासह विविध भागात पाणी आहे. नवीन बांधलेल्या सोलूर रस्त्यावरील पुलावर तीन ते चार फूट पाणी आहे. शहरात अनेक ठिकाणी आता रस्त्यांवर होड्या उतरल्या आहेत. यातून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान पाण्याची पातळी पंढरीत रात्री वाढल्याने पाणी विविध भागात पोहोचत होते. प्रांताधिकारी सचिन ढोले ,उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्यासह अधिकारी हे ठिकठिकाणी जावून पाहणी करत होते. दरम्यान रेस्न्यू टीम (बचाव पथक) ही शहरात आले आहे.
(म.फुले चौक पंढरपूर )