भगतसिंग यांच्या फाशीवेळी ब्रिटिशांना जो आनंद झाला, तसा राज्यपालांना…’;

 

एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या बंडानंतर ठाकरे सरकार कोसळलं यानंतर शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालं. हा महाविकास आघाडीसाठी पहिला धक्का होता. यानंतर विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीतही शिंदे सरकारच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आणि आता आज बहुमत चाचणी होणार आहे. या सर्व घडामोडींवर शिवसेनेनं सामनातून निशाणा साधला आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय? शिंदे गटाच्या आमदारांच्या जोरावर भाजपने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणवून घेणारे गृहस्थ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी व आता भाजप असा प्रवास करीत ते विधानसभा अध्यक्षपदापर्यंत पोहोचले.

कधी, कुठे टांग टाकायची हे त्यांना कळते. भारतीय जनता पक्षात शिवसेनेचा किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करण्याची कुवत आणि हिंमत नाही. शिवसेनेतच तोडफोड करून त्यातील एखादा शिवसेनेच्या विरोधात उभा केला जातो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक भाजपने जिंकली यात आम्हाला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

राहुल नार्वेकर यांना 164 आमदारांनी मतदान केले. शिवसेनेचे राजन साळवी यांच्या बाजूने 107 मते पडली. शिंदे गटाच्या भाजपपुरस्कृत आमदारांनी पक्षाचा व्हीप पाळला नाही. त्यामुळे याबाबत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई सुरू होईल, पण आता हे सर्व टाळण्यासाठीच विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपने कायद्याचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तीस बसवले व त्याबरहुकूम त्यांना हवे तसे निर्णय घेतले जातील.

शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असताना या आमदारांना मतदानात भाग घेऊ देणे बेकायदेशीर आहे, पण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही. आज शिंदे सरकारची खरी परीक्षा; बहुमत चाचणीसाठी ठरली रणनीती, मॅजिक फिगर गाठणार का? सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा मोठा प्रवास करून शिंदे गटाचे आमदार मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळापासून कुलाब्यातील त्यांच्या हॉटेलपर्यंत सुरक्षेसाठी हजारो केंद्रीय जवान दुतर्फा बंदुका घेऊन उभे होते. फक्त हवाई दल व सैन्यच वापरायचे काय ते बाकी होते. कसाबच्या सुरक्षेसाठीही इतके पोलीस नव्हते, पण महाराष्ट्र हा शहीद स्वाभिमानी तुकाराम ओंबळेंचा आहे, हे शिंदे गटाच्या आमदारांनी विसरू नये.

आमदार आले, भगवे फेटे घालून बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळय़ास अभिवादन केले. पण या सगळय़ांचे चेहरे साफ पडलेले दिसत होते. त्यांचे पाप त्यांचे मन कुरतडत आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक चैतन्य व ऊर्जेचा सूर्य आहे, हे भगवे फेटेधारी आमदार काजवेही नव्हते.

Team Global News Marathi: