‘बेळगावी’ म्हणणारे पाटील महाराष्ट्राचे कसे? जितेंद्र आव्हाड यांची टीका

 

पुन्हा एकदा सीमावादावरून राजकारण तापले आहे. भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी केल्याने ते महाराष्ट्राच्या की कर्नाटकच्या बाजूने आहेत, हेच समजत नसल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी केली.चंद्रकात पाटील यांनी सोशल मीडियावर बेळगावचा उल्लेख ‘बेळगावी’, असा केला आहे.

महाराष्ट्रात बेळगावचा उल्लेख हा बेळगाव असाच केला जातो, किंबहुना तेथील मराठी माणूसदेखील तसाच उल्लेख करीत आहे. कर्नाटकी लोक बेळगावी असा उल्लेख करतात. त्यामुळे पाटील हे महाराष्ट्राच्या की कर्नाटकच्या बाजूने आहेत, तेच कळत नसल्याची टीका आव्हाड यांनी केली.पाटील हे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील पहिल्या पाचमधील एक मंत्री असून, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. दिल्लीत चांगले वजन असलेले नेते आहेत. ते आपल्या समाजमाध्यमांवर बेळगावचा उल्लेख बेळगावी करतात, हे दुर्दैव आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याविषयी महाराष्ट्राचे राज्यपाल अवमानकारक बोलतात. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही. राज्यपाल जेव्हा बोलले, तेव्हाच मराठी माणसाने पेटून उठायला हवे होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र बंद पुुकारण्याबाबत अजित पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलत आहेत. हे सर्व नेते चर्चा करून बंदची तारीख जाहीर करतील, अशी माहिती आव्हाड यांनी दिली.

तसेच ‘हर हर महादेव’ चित्रपटादरम्यान विवियाना मॉल येथे झालेल्या गदारोळानंतर मनसे नेत्याने एका वरिष्ठाशी बोलून माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याकरिता परिक्षित धुर्वे यांच्या पत्नीवर दबाव आणला होता. मात्र त्यांनी त्यास नकार दिला, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. आपल्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे कारस्थान हे त्या दिवसापासून सुरू होते, असेही आव्हाड म्हणाले.

 

Team Global News Marathi: