‘आधारभूत किंमत आणि सरकारी खरेदी ही देशाच्या अन्नसुरक्षेचा महत्त्वाचा भाग’ – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली – किमान आधारभूत किंमत आणि सरकारी खरेदी ही देशाच्या अन्नसुरक्षेचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. तसेच बाजार समित्यांमध्ये पायाभूत सुधारणा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, आधारभूत किंमतीने सरकारी खरेदी कायम सुरू राहणार असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
अन्न व कृषी संघटनेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त ७५ रुपयाच्या विशेष नाण्यांचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. या कायद्यांमुळे सरकारी खरेदी आणि आधारभूत किंमत बंद होण्याची भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. मात्र, सरकारी खरेदी सुरू राहणार असून, आधारभूत किंमतही कायम राहणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. बाजार समित्यांची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या संकटात जगात अन्नधान्य आणि कुपोषणाची समस्या असतानाही भारताने ८० कोटी लोकांना १.५ लाख कोटींच्या मोफत अन्नधान्याचे वाटप केल्याचे पंतप्रधान म्हणाले.
कोरोनाच्या संकटातसुद्धा भारताच्या कृषी क्षेत्रात बरीच सुधारणा झाली आहे. भारतातील अन्नस्थितीत आणखी सुधारणा करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी गहू आणि भात पिकांसाठी शेतकऱ्यांना नवीन १७ वाणांचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
२०२३ हे बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. यामुळे दोन फायदे होतील एक पोषण सुधारेल आणि लहान शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले. भारत आणि भूतानच्या संबंधाविषयी बोलताना
पंतप्रधान म्हणाले की, या देशांदरम्यान कृषी मालासाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या देशांमधील व्यापार वाढणार आहे. या दोन देशांमध्ये सफरचंद, बटाटे, टोमॅटो, आले, कांदा, भेंडीचा व्यापार वाढण्याला चालना मिळणार असल्याचेही मोदी
म्हणाले.
भारत हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेचा ७५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात नरेंद्र मोदी बोलत होते. अन्न व कृषी संघटना ही देशातील दुर्बल घटक व सर्वसामान्य जनतेला आर्थिक व पोषक आहारदृष्ट्या मजबूत करण्याचे काम करते. या संस्थेची संदस्य संख्या ही १९७ देश आहेत. भारत हा स्थापनेपासूनच या संघटनेचा सदस्य आहे.