शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवस बँक बंद…आयकर भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतच मुदत!
ग्लोबल न्यूज: बँक खातेधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमची बँकेची कामे काही कारणास्तव खोळंबली असतील तर ती येत्या तीन दिवसात उरकणे गरजेचे असणार आहे. कारण पुढील तीन दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे तुमची बँकेची कामे रखडण्याची शक्यता आहे. यासाठी आठवडा संपण्याची वाट न पाहता गुरुवारपर्यंत बँकिंगची कामे पूर्ण करा.
येत्या शुक्रवारी २५ डिसेंबर असल्याने बँकांना नाताळची सुट्टी असेल. तसेच प्रत्येक महिन्यात बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात. त्यामुळे नाताळच्या दुसऱ्यादिवशी २६ डिसेंबरला चौथा शनिवार आला असून त्यानंतर रविवारी, २७ डिसेंबर म्हणजेच आठवड्याची सुट्टी असणार आहे. त्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.
आयकर भरण्यासाठी सरकारने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आयकर भरण्यासाठी तुम्हाला बँकेच्या कागदपत्रांची आवश्यकता भासल्यास सुट्ट्यांमुळे ते शक्य होणार नाही. त्यामुळे येत्या २४ डिसेंबरपर्यंत बँकची सर्व कामे करुन घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, पुढील आठवडा हा यावर्षीतील शेवटचा आठवडा असल्याने १ जानेवारी २०२१ पासून बँकेच्या काही नियमांमध्ये बदल होऊ शकतात. तसेच आरबीआयने चेक पेमेंटसाठी नव्या वर्षापासून ‘पॉझिटिव पे सिस्टम’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चेक पेमेंटमध्ये होणाऱ्या गैरवापरावर आळा घालण्याच्या उद्देशाने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.