बंडखोर आमदारांच्या कार्यालयातील उद्धव, आदित्य ठाकरेंचे फोटो गायब !

 

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत राज्याचे राजकारण चांगलेच तापवले होते त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता अशातच आता बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयात माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो काढायला सुरवात केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या जागी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आहे. याची सुरवात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्यापासून झाली आहे.

राज्यात शिवसेना आणि शिंदे गटाचे वाद सुरु असतांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आम्ही बोलणार नसल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी बोलून दाखवली आहे. मात्र दुसरीकडे आता बंडखोर आमदारांकडून आपल्या कार्यालयात लावण्यात आलेल्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले जात आहेत.

बंडखोरी करण्यापूर्वी आमदार शिरसाट यांच्या कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र आता यातील उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहे.

शिंदे गटात सहभागी झालेल्या आमदार शिरसाट यांनी आपल्या कार्यालयात लावण्यात आलेल्या फोटोमध्ये मोठा बदल केला आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढले असले तरीही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मात्र कायम आहे. तर बाळासाहेब यांच्या फोटोच्या बाजूला आणखी एक फोटो लावण्यात आला असून, तो आनंद दिघे यांचा आहे. तसेच शिरसाट यांनी आपल्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सुद्धा फोटो लावला आहे.

 

Team Global News Marathi: