बाळासाहेब, पवारांचे बोट धरून पुढे आलो; पवारांचे वय मोजू नये – संजय राऊत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे बोट धरून आम्ही पुढे आलो आहे. शरद पवारांकडून आम्ही रोज प्रेरणा घेत आहे. त्यांचे वय कोणी मोजू नये, असे सांगत पवार हे देशाचे नेते आहेत.
भविष्यात त्यांना राष्ट्रीयस्तरावर मोठी संधी प्राप्त होवो, अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस या निमित्ताने संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, पवारांकडून आम्हाला सतत प्रेरणा मिळत असते. त्यांचे बोट धरूनच आम्ही राजकारणात आलो आहोत. गेल्या पाच पिढ्यांना शरद पवार प्रेरणा देत आहेत.
त्यामुळे त्यांच्या वयाचा कोणी हिशोब करू नये. ते त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. सगळे तरुण फिके पडतील अशा प्रकारचे काम ते आजही करत असतात. त्यांच्याकडून आम्ही रोज प्रेरणा घेत असतो. त्यामुळेच त्यांच्या वयाचा हिशोब करणं हा त्यांच्यावर अन्याय ठरेल, असं राऊत म्हणाले.